Belagavi

बेळगावमध्ये पोलीस ध्वज दिन उत्साहात साजरा

Share

बेळगावमध्ये बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज कर्नाटक राज्य पोलीस ध्वज दिन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.


बेळगावमधील जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षपद उत्तर विभागाचे आयजीपी डॉ. चेतन सिंग राठोड यांनी भूषवले. निवृत्त पीएसआय आर. बी. सौदागर आणि पी. नागराज यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून पोलीस ध्वजांचे वितरण केले आणि पोलीस दलातील शिस्तीचे महत्त्व विषद केले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक पथसंचलन आणि मानवंदना देण्यात आली.

पोलीस ध्वज दिनानिमित्त स्टॅम्प्सची विक्री केली जाते आणि त्यातून जमा झालेला निधी कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वापरला जातो, अशी माहिती आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी दिली. डीजी-आयजीपी सलीम यांनी पोलीस कल्याण केंद्रासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगावमधील कंग्राळी येथे पोलीस भवनासाठी जागा निश्चित केली असून, यंदाच्या वर्षात हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे चेतन सिंग राठोड यांनी सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मागणीनुसार जिम आणि अंगणवाडीचे कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२ एप्रिल १९६५ पासून कर्नाटकात पोलीस कायदा लागू झाला असून, निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे डीसीपी नारायण बरमनी यांनी स्पष्ट केले.

समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. कल्याण निधीतून ६४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी ७ लाख ४१ हजार रुपये, तर १५ जणांच्या अंत्यसंस्कारासाठी दीड लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

पोलीस ध्वज हा केवळ एक संकेत नसून तो शिस्त आणि त्यागाचे प्रतीक आहे. पोलीस दल मजबूत असेल तरच समाज बलवान होईल, असे प्रतिपादन निवृत्त पीएसआय आर. बी. सौदागर यांनी केले.

पोलीस दलातील त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. पोलीस कल्याण निधी हा निवृत्तांच्या आरोग्यासाठी आणि समस्या निवारणासाठी अत्यंत पूरक असल्याचे निवृत्त पीएसआय पी. नागराज यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: