बेळगावमधील ओंकार नगरमध्ये एका पाळीव कुत्र्याने शेजाऱ्यावर भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याला बिस्किट खायला घालण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर कुत्र्याने झडप घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
बेळगावमधील ओंकार नगर येथे शेजाऱ्यांनी त्यांचे पाळीव कुत्र्याला सांभाळण्यासाठी सोडून गेले होते. यावेळी कुत्र्याला बिस्किट देण्यासाठी गेलेल्या तावरप्पा लमाणी (४८) यांच्यावर त्याच कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तावरप्पा यांच्या हात, पायांसह शरीराच्या इतर भागांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
घटनेनंतर जखमी तावरप्पा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची भीती पसरली असून, पाळीव प्राण्यांना जबाबदारीने सांभाळावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. तावरप्पा लमाणी यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.


Recent Comments