बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाया केल्या आहेत. यामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जुगार, अंमली पदार्थांचे सेवन आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कॅम्प पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक रुक्मिणी ए. यांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अरुण परशुराम गाडीवड्डर याला ताब्यात घेतले. तसेच गणेशपूरमधील दुर्गा कॉलनी येथे आरोपीकडून बेकायदेशीररीत्या बाळगलेली तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुंद्रेश के. होळन्नवर आणि पथकाने हलगा ग्रामपंचायतीजवळील विजयनगर तलावाकाठी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत विश्वनाथ रवी गोटडकी, रवी महावीर दड्डी, लक्ष्मण यल्लाप्पा माशानक, नागप्पा सिद्राय नायक आणि कल्लाप्पा शेट्टेप्पा मास्तमर्डी या ५ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २१ हजार रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
उद्यमबाग औद्योगिक परिसरात अमली पदार्थाचे सेवन करून संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या मल्लाप्पा आनंद गुळेची याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या गिरीश रमेश हालपेटी आणि बसवराज दुंडप्पा इटगी या दोघांविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या यशस्वी कारवायांबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments