Vijayapura

विजापूरमध्ये अपघाताचा बनाव रचून तरुणाची आत्महत्या; मृत्यूआधीचा व्हिडिओ व्हायरल

Share

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील कन्नोळी टोल नाक्याजवळ काल दुपारी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. वरवर हा अपघात वाटत असला तरी, आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

संबंधित तरुणाने अपघातात जीव गमावण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

विजापूरमध्ये प्रेमभंगाच्या नैराश्यातून अभिषेक नागराळ या तरुणाने धावत्या सरकारी बसला दुचाकी धडकवून आत्महत्या केली. या भीषण धडकेनंतर दुचाकीने पेट घेतला आणि अभिषेकचा जागीच जिवंत जळून मृत्यू झाला. मृत्यूआधी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेकने म्हटले आहे की, “आज मी मरणार आहे. मला ती हवी आहे आणि तिला माझ्यापासून दूर करणाऱ्यांनाच माझ्या मृत्यूला जबाबदार धरावे.”

या व्हिडिओमध्ये अभिषेकने थेट तिघांची नावे घेतली आहेत. वीरेश नंदूर, त्यांची आई चैत्रा नंदूर आणि नातेवाईक नवीनकुमार पाटील या तिघांमुळेच मी हे पाऊल उचलत असल्याचे त्याने स्पष्टपणे नमूद केले. ही पोस्ट केल्यानंतर काही तासांतच अभिषेकने आपली दुचाकी सरकारी बसवर आदळली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकीने तातडीने पेट घेतला. अभिषेकला बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने तो आगीत होरपळून मृत्युमुखी पडला. बसमधील चालक, वाहक आणि प्रवासी तातडीने खाली उतरल्याने सुदैवाने ते बचावले आहेत.

प्रेमात मिळालेल्या अपयशातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अभिषेकचा इन्स्टाग्राम व्हिडिओ पुराव्यासाठी ताब्यात घेतला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून, बस चालक आणि इतर साक्षीदारांची चौकशी सुरू आहे.

एकूणच या घटनेमुळे तरुणांमधील मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रेमभंग किंवा छोट्या समस्यांसाठी आत्महत्येसारखा निर्णय घेणे चुकीचे असल्याची चर्चा समाजात सुरू आहे. विजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चौकशीनंतरच नेमके सत्य समोर येईल.

Tags: