हुबळी येथील एच. एस. कोत्तंबरी विज्ञान महाविद्यालयातील निवृत्त जीवशास्त्र प्राध्यापक डॉ. शंकर गुरुसिद्धप्पा जिगजन्नी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यइच्छेनुसार वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी त्यांचे देहदान करण्यात आले आहे.
मूळचे शाहूनगर येथील रहिवासी असलेल्या डॉ. शंकर जिगजन्नी यांनी आपल्या निधनानंतर देहदान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. डॉ. रामण्णावार चॅरिटेबल ट्रस्ट, बैलहोंगल यांच्या माध्यमातून त्यांचे पार्थिव केएलई जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाकडे (जेएनएमसी) सुपूर्द करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.
या उदात्त कार्याबद्दल डॉ. रामण्णावार चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावार यांनी जिगजन्नी कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ. शंकर जिगजन्नी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.


Recent Comments