बेळगाव तालुक्यातील मुतगा येथील हनुमान यात्रोत्सवानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात भारतीय पैलवानांचा दबदबा पाहायला मिळाला. इराणच्या तगड्या मल्लाचा पराभव करत कोल्हापूरच्या जयदीप पाटीलने मुतगा मैदानाचा ‘किंग’ होण्याचा मान पटकावला.

मुतगा येथील हनुमान कुस्ती संघटना आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दामनी तलावाच्या परिसरात या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. मैदानातील प्रमुख आकर्षण असलेल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा उदयोन्मुख मल्ल जयदीप पाटील आणि इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान इरफान यांच्यात रोमहर्षक लढत झाली. सुमारे २६ मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या कुस्तीत जयदीप पाटीलने ‘बाहेरची टांग’ लावून इराणी पैलवानाला चितपट केले आणि विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पुण्याचा सचिन ठोंबरे आणि पंजाबचा गोगीसिंग यांच्यात चुरशीची लढत झाली. सचिन ठोंबरेने आपल्या चाणाक्ष डावांनी गोगीसिंगवर मात करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत दिल्लीच्या करणने दड्डी येथील शिव याला अवघ्या एका मिनिटात ‘एकचाक’ डावावर अस्मान दाखवले. याशिवाय नेपाळच्या देव थापा याच्या चित्तथरारक कुस्तीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
या मैदानात एकूण ६० हून अधिक चुरशीच्या कुस्त्या झाल्या. स्थानिक मल्ल मुतगाच्या भूमिपुत्राने चिकोडीच्या अनिलला चितपट करून सर्वांचे लक्ष वेधले, तर दादा कोळेकरने ‘हप्ता’ डावावर दिल्लीच्या आयुषचा पराभव केला. कुस्ती पंच म्हणून नवीन पाटील, भावकण्णा पाटील आणि इतर ज्येष्ठांनी काम पाहिले. ग्रामपंचायत, ग्राम सुधारणा मंडळ आणि मंदिर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विजेत्या मल्लांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.


Recent Comments