विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कुडगी येथील एनटीपीसी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.

कुडगी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पात निर्माण होणारी राख कृत्रिम तलावांमध्ये साठवून नंतर इतरत्र नेली जाते. मात्र, ही राख वाऱ्याने उडून सभोवतालच्या शेतात पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मसुती गावाजवळील राख साठवणूक तलावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी उघड्या टिप्परमधून राखेची वाहतूक होत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी गाड्या अडवून जोरदार निदर्शने केली.
राखेमुळे पिके तर नष्ट होत आहेतच, शिवाय मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून जमिनीचा कस कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि भूगर्भातील पाणी प्रदूषित होत असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान टिप्पर चालक आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
एनटीपीसी प्रकल्पाच्या स्थापनेवेळी राखेचा कोणताही त्रास होणार नाही आणि शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती गंभीर झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राखेची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावावी, उघड्या वाहनांऐवजी बंदिस्त टँकरमधून वाहतूक करावी आणि शेतीचे नुकसान टाळावे, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनटीपीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments