Belagavi

बेळगावात प्राथमिक शिक्षक संघाकडून महिला दिन उत्साहात साजरा

Share

बेळगावमधील कुमार गंधर्व कला मंदिर येथे कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ आणि सरकारी महिला कर्मचारी संघाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघटनात्मक ऐक्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सुटत असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ, बेंगळुरू आणि अखिल कर्नाटक राज्य सरकारी महिला कर्मचारी संघ, बेळगाव घटक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर नुग्गली यांनी यावेळी संघटनात्मक शक्ती आणि महिला सक्षमीकरणावर भाष्य केले. शिक्षकांना आपल्या कामांसाठी आता सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज उरलेली नाही, संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे निराकरण घरबसल्या होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षक आपल्या कामांसाठी थेट शिक्षण विभाग किंवा संबंधित कार्यालयात जाण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. जिल्हा आणि तालुका संघटनांच्या माध्यमातून त्यांची कामे मार्गी लावली जातात. निवडणूक ड्युटी, जनगणनेचे काम यांसह शिक्षकांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी संघटना प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे चंद्रशेखर नुग्गली यांनी म्हटले आहे.

जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील संघटना अत्यंत सक्रिय आहे. शाळा आणि शिक्षकांच्या घरापर्यंत सुविधा पोहोचवण्याचे काम ही संघटना करत आहे. महिलांना संघटनेत प्राधान्य देण्यामध्ये बेळगावचा शिक्षक संघ अग्रेसर आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने महिलांना महिन्यातून एक विशेष रजा देऊन त्यांचा गौरव केला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर नुग्गली यांनी दिली.

या जगात महिलेचे स्थान अमूल्य आहे. महिला दिन केवळ मार्च महिन्यापुरता मर्यादित राहू नये. हवा आणि प्रकाश जसा नैसर्गिक आहे, तसेच या जगासाठी महिलेचे अस्तित्व नैसर्गिक आहे. प्रत्येकीने स्वतःला ओळखले पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजे, असे मत डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला राज्याचे सरचिटणीस चेतन एच. एस., राज्य संघटन सचिव प्रमिला कामनहळ्ळी, जिल्हा सरचिटणीस रमेश गोणी, जगदीशगौडा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मल्लिकार्जुन सिद्धनगौडर, शंकरम्मा हुग्गी, कोषाध्यक्ष यल्लाप्पा पूजेर आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: