Belagavi

बेळगाव : सरदार महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Share

बेळगावमधील प्रतिष्ठित सरकारी सरदार पदवीपूर्व महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, यानिमित्त विद्यार्थिनींना महिलांविषयक कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

बेळगावच्या सरकारी सरदार पदवीपूर्व महिला महाविद्यालय आणि वकील परिषद उत्तर कर्नाटक घटक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी महाविद्यालय परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. आर. पाटील होते. समाजात महिलांनी आत्मविश्वासाने जगण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. संविधानाने महिलांना दिलेले हक्क प्रत्येक विद्यार्थिनीला माहित असावेत, असे आवाहन अधिवक्ता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सचिन शिवण्णवर यांनी केले.

यावेळी उच्च न्यायालयाच्या वकील चित्रा गौंडलकर यांनी महिलांशी संबंधित विविध कायद्यांवर विशेष व्याख्यान दिले. कार्यक्रमाला प्रा. जयशीला, प्रा. चौगला, प्रा. रेड्डी आणि अधिवक्ता परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सदाशिव हिरेमठ उपस्थित होते. या जनजागृती कार्यक्रमात जयश्री मंद्रोळी, दीपक नवरक्की, चन्नवीरेश कलमठ, प्रदीप हुक्केरीमठ या वकिलांसह महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून माहिती घेतली.

Tags: