Belagavi

सातत्यपूर्ण परिश्रमातूनच मानवी जीवनात यश शक्य

Share

बेळगावमधील शहापूर येथे आयोजित गौरव सोहळ्यात प्रादेशिक आयुक्त जानकी केएम यांनी यश प्राप्तीसाठी परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात सातत्याने कष्ट करणाऱ्या व्यक्तीलाच ध्येय गाठता येते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहापूरमधील गाडे मार्ग येथे छलवादी महासंघातर्फे विविध क्षेत्रांतील गुणवंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना जानकी केएम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या जीवनाचा मूलमंत्र व्हायला हवेत, असे सांगितले. शोषित समाजातून पुढे येऊन अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या आंबेडकरांनी संपूर्ण जगाला नवी दिशा दिली असून तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्याची संधी निर्माण केली आहे, असे जानकी केएम यांनी म्हटले.

तळागाळातील समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्या वेदना आपल्यालाच माहित असतात, त्यामुळे स्वतः जबाबदारी स्वीकारून समाजाला पुढे नेण्याचे काम छलवादी युवा संघ करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे जानकी केएम यांनी नमूद केले.

कार्यक्रमात बोलताना आर. एस. कोठारे यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला. छलवादी युवा संघ दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या ५೦ ते ६೦ गुणवंतांचा सत्कार करत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याची भावना आर. एस. कोठारे यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यात कुमार कोलकार, प्रताप चावडीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील ६೦ गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष सत्यनायक, यल्लाप्पा कोलकार, विनोद कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: