Belagavi

बेळगावमध्ये सफाई कामगाराचा टिप्परच्या धडकेत मृत्यू

Share

बेळगाव-खानापूर रस्त्यावर शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या एका महिला सफाई कामगाराचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या टिप्पर चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

अवक्का कोलकार (५०) असे मृत महिलेचे नाव असून त्या नेहमीप्रमाणे रस्त्यावर स्वच्छता करत होत्या. यावेळी बेळगाव शहराकडून भरधाव वेगाने आलेल्या एका टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अवक्का यांचा जागीच मृत्यू झाला असून बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना माजी उपमहापौर वाणी जोशी यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या सफाई कामगार अवक्का यांचा टिप्परच्या धडकेमुळे जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या चालकाला पोलिसांनी अटक केली असल्याचे वाणी जोशी यांनी म्हटले आहे.

महानगरपालिकेचे पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. रस्ते अपघातात सफाई कामगाराचा बळी जाण्याची ही दुसरी घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. मृत अवक्का यांच्या कुटुंबाला सरकारी नियमानुसार सर्व लाभ मिळवून दिले जातील, तसेच अंत्यसंस्कारासाठी महानगरपालिकेकडून तातडीची आर्थिक मदत केली जाईल, असे हनुमंत कलादगी यांनी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच अवक्का यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: