आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्या, २८ मार्च रोजी चिकोडी तालुक्यातील यडूर ग्राम भेटीवर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी पत्रकार परिषदेत या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. डॉ. मोहन भागवत यांचे उद्या सकाळी ८.४५ वाजता यडूर येथे आगमन होईल. वीरभद्रेश्वर मंदिराच्या गुरुकुल सभागृहातील श्री काडसिद्धेश्वर मठात त्यांच्या हस्ते ‘गो-तुलाभार’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाचे नेतृत्व हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी करणार असून, नूलन सुरगीश्वर मठाचे गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पाहुण्यांचा परिचय करून देतील. श्रीकांत उमराणी आणि चिकोडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह संजय अडके स्वागत करतील.
या भेटीदरम्यान डॉ. मोहन भागवत राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण पिढीला प्रेरणा देणारे संघाचे कार्य, तसेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांच्या विकासात वीरशैव लिंगायत समुदायाचे असलेले योगदान या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अखिल भारतीय वीरशैव महासभेचे उत्तर कन्नड जिल्हाध्यक्ष शिवलिंगय्या अल्लय्यनवरमठ, अडवय्या अरळीकट्टीमठ, शिवानंद हकटे यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


Recent Comments