Belagavi

रामतीर्थनगरमध्ये नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांचा सन्मान

Share

बेळगावमधील रामतीर्थनगर येथे रामनवमीनिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्यात कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या काळात पालकांना विसरत चाललेल्या पिढीसाठी प्रभू श्रीरामांची पितृभक्ती दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

रामतीर्थनगरमधील बसवेश्वर कॉलनी येथे पार पडलेल्या या सोहळ्यात कारंजीमठ स्वामीजींनी श्रीरामांच्या जीवनमूल्यांवर प्रकाश टाकला. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही रामनवमी भक्तीभावाने साजरी केली जाते. रामाचे आदर्श जीवनात रुजवण्यासाठीच हा उत्सव महत्त्वाचा असून, मुलांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून रामासारखी सेवा करावी, असे आवाहन श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी केले.

याच कार्यक्रमात बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल महापौर प्रीती कामकर यांनी आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमात साहित्यिक डॉ. सी. बी. मोरबद यांनी श्रीरामांच्या आदर्शांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. आकाशवाणीचे गायक गुरुराज कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘गीत रामायण’ गायनाने भक्त मंत्रमुग्ध झाले, तर राघवेंद्र कुलकर्णी यांनी त्याचे निरूपण केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ए. के. अजगेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: