Belagavi

बेळगावात संत बसवेश्वर जयंती उत्सवाचे भव्य आयोजन

Share

बेळगावमधील शिवबसवनगर येथील लिंगायत भवनात विविध लिंगायत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संत बसवेश्वर यांची जयंती यंदाही उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वीरराणी कित्तूर चन्नम्मा चौकातून शहरात बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसोबतच बसवेश्वर चौकात प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या १५ फूट उंचीच्या संत बसवेश्वर यांच्या मूर्तीची मिरवणूक बसवेश्वर उद्यान ते गोवावेसपर्यंत काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता राणी चन्नम्मा चौकातून मुख्य मिरवणूक निघणार आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी १० सदस्यांचे समन्वयक मंडळ स्थापन करण्यात आले असून, वकील बसवराज रोट्टी यांची मुख्य समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.

या समितीमध्ये सह-समन्वयक म्हणून वीरशैव लिंगायत महासभेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, लिंगायत संघटनेचे अध्यक्ष ईरण्णा दयन्नवर, राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष अशोक बंडीगेरी, लिंगायत सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एम. दोडमनी आणि लिंगायत क्षेमाभिवृद्धी संघाचे अध्यक्ष एस. जी. सिदनाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बैठकीत लिंगायत बिझनेस फोरमचे किरण अगडी, लिंगायत धर्म महासभेचे अध्यक्ष महांतेश गुडस, सिव्हिल इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश तुबची आणि बसव कायकजीवी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत बावी यांचीही विविध जबाबदाऱ्यांसाठी निवड करण्यात आली.

उत्सवाचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी अर्थ समिती, प्रचार समिती, मिरवणूक समिती, प्रसाद दासोह समिती आणि वाहतूक समिती अशा विविध उपसमित्यांची रचना करण्यात आली आहे.

समन्वयक बसवराज रोट्टी यांनी उत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. संत बसवेश्वर जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व बांधवांनी आणि संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन बसवराज रोट्टी यांनी केले. या बैठकीला बेळगाव महानगरातील विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Tags: