Belagavi

कपिलेश्वर मंदिरातून कोल्हापूरसाठी सासनकाठ्यांचे प्रस्थान

Share

चैत्र पौर्णिमेनिमित्त बेळगावमधून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणाऱ्या सासनकाठी पदयात्री आणि बैलजोड्यांसाठी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने बेळगावमधील चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठी, नार्वेकर गल्लीतील जोतिर्लिंग मंदिर आणि कोंडुसकोप येथील सासनकाठ्या बैलगाड्यांसह कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत. या प्रवासादरम्यान बैलांचे आरोग्य जपण्यासाठी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने पौष्टिक आहार देण्यात आला, तर पदयात्री भाविकांना प्रवासासाठी आवश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

पदयात्रेच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी भेट देऊन सासनकाठ्यांचे विधीवत पूजन केले आणि सामूहिक महाआरती संपन्न झाली.

या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजित चव्हाण, अजित जाधव, प्रसाद बाचुलकर, राजू भातकांडे, तानाजी मुत्केकर यांच्यासह अभय लगाडे, जोतिबा कावळे तसेच इतर विश्वस्त आणि महिला सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: