Vijayapura

विजापुरात ‘शक्ती’ योजनेचा बोजवारा

Share

कर्नाटक सरकारची ‘शक्ती’ योजना राज्यात महिलांसाठी मोफत प्रवासाची सोय देत असली, तरी विजापूर शहरातील रंभापूर परिसरातील महिला मात्र या योजनेपासून वंचित असून बस सेवाच उपलब्ध नसल्याने महिलांना रोज पायपीट करावी लागत आहे.

विजापूर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेला रंभापूर परिसर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र, तरीही येथे सिटी बस सुरू झालेली नाही. या भागात २०० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास असून, दररोज कामासाठी किंवा शिक्षणासाठी शहरात येणाऱ्यांना स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो किंवा पायपीट करावी लागते. वारंवार विनंती करूनही जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही.

रंभापूर परिसर राष्ट्रीय महामार्गालगत असून जवळच शिवगिरी हे पर्यटन स्थळही आहे. तरीही बसची व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांना महामार्ग ओलांडून सिंदगी नाक्यापर्यंत चालत यावे लागते. तिथून रिक्षाने शहरात पोहोचावे लागते. “राज्यात सगळीकडे महिलांना मोफत प्रवास आहे, मग आमच्या नशिबी पायपीट का?” असा संतप्त सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, तरीही बस सोडली जात नाही, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आतापर्यंत अनेकदा निवेदने देऊन थकलेल्या रंभापूरच्या नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने तातडीने बस सेवा सुरू करून प्रवासाची सोय करावी, अन्यथा तीव्र लढा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags: