बेळगावमध्ये इंधन टंचाईच्या अफवेवरून मंगळवारी दुपारी वाद निर्माण झाला. रामदेव हॉटेलजवळील पेट्रोल पंपावर झालेल्या हाणामारीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
बेळगावमधील रामदेव हॉटेलशेजारी असलेल्या शेल पेट्रोल पंपावर मंगळवारी दुपारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी रांगेत उभे असलेल्या महाविद्यालयीन तरुणांच्या दुचाकीचा दुसऱ्या एका वाहनाला स्पर्श झाल्याने शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, स्थानिक नागरिकांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची दखल घेत बेळगाव पोलिसांनी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पेट्रोल पंपावर गोंधळ घालणाऱ्यांवर किंवा अशिस्त वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यावर बंदी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Recent Comments