Belagavi

बेळगाव महानगरपालिकेच्या मालमत्ता करवाढीला तीव्र विरोध

Share

बेळगाव महानगरपालिकेने मालमत्ता करात केलेली वाढ आणि कचरा संकलन शुल्काविरोधात अनगोळमधील नागरिकांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

महानगरपालिकेने सन २०२६-२७ या वर्षासाठी मालमत्ता करात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी अनगोळमधील नागरिक आणि व्यापारी एकत्र आले होते. यासंदर्भातील निवेदन महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांना देण्यात आले.

“गेल्या वेळी कचरा संकलनासाठी व्यापाऱ्यांकडून जादा कर आकारण्यात आला होता आणि आता पुन्हा करात वाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईत ही करवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे ही वाढीव करवाढ तातडीने रद्द करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा विनायक गुंजटकर यांनी दिला आहे.

महानगरपालिका सदस्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी दरवर्षी करात वाढ करून जनतेवर आर्थिक बोजा टाकल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

“चौथ्या रेल्वे गेटचे काम सुरू झाल्याने या भागातील वाहतूक कमी झाली आहे. याचा थेट परिणाम व्यापारावर झाला असून अशा कठीण काळात करवाढ करणे चुकीचे आहे,” अशी प्रतिक्रिया राजू पवार यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या या धोरणाचा निषेध करत ही करवाढ सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे शिवानंद मलगान यांनी म्हटले आहे.

Tags: