Belagavi

पेट्रोल तुटवड्याच्या अफवेमुळे बेळगावात दोन गटांत संघर्ष

Share

बेळगावमध्ये इंधनाच्या कथित तुटवड्यावरून पसरलेल्या अफवांनी आता हिंसक वळण घेतले असून, पेट्रोल पंपांवर नागरिक एकमेकांशी भिडत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर इंधनासाठी वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून, या तणावपूर्ण वातावरणात किरकोळ वादातून मारामारीच्या घटना घडत आहेत.

बेळगावमधील रामदेव हॉटेल जवळील शेल पेट्रोल पंपावर मंगळवारी दुपारी इंधनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इंधन संपण्याच्या भीतीपोटी शेकडो वाहनधारक रांगेत उभे असताना, एका महाविद्यालयीन तरुणाची दुचाकी आणि एका व्यक्तीच्या वाहनाचा किरकोळ स्पर्श झाला. यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक विकोपाला गेली आणि दोन्ही गटांमध्ये भररस्त्यात हाणामारी झाली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

इंधनासाठी झालेल्या या प्रचंड गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, याचा मोठा फटका महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रवाशांना बसला. ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली असून, स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा प्रशासनाने पेट्रोल तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले असून अशा घटनांमुळे सार्वजनिक शांतता बाधित होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Tags: