Belagavi

बेळगाव जिल्ह्यात इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसचा तीव्र तुटवडा

Share

बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेट्रोल पंपांवरील वाढत्या गर्दीमुळे आणि गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत.

बैलहोंगल तालुक्यातील संपगावसह जिल्ह्याच्या विविध भागांत इंधनासाठी नागरिकांची मोठी पायपीट सुरू आहे. पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच डबे आणि बाटल्या घेऊन नागरिक रांगा लावत असून, ही गर्दी नियंत्रित करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. इंधनावरून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये वादावादी होऊन संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. डिझेल उपलब्ध नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हुक्केरीमध्ये गॅसअभावी व्यापार थंडावल्याने आणि कर्जाच्या विळख्यातून एका हॉटेल मालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: