बेळगाव तालुक्यातील हलगा गावात वीज खांब हटवण्याच्या किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या पल्लवी तळवार या अल्पवयीन मुलीला आरोपींनी अमानवीयपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
बस्तवाड-हलगा येथील रहिवासी अरुण तळवार यांच्या घरासमोरील वीज खांब हलवण्यावरून वादाला तोंड फुटले. आरोपी नागप्पा तळवार आणि पुंडलिक कोलकार यांनी अरुण यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पल्लवी या मुलीच्या कानशिलात आणि कानावर आरोपींनी जोरात प्रहार केल्याने ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या पल्लवीला तातडीने बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या राड्यादरम्यान शशिकला तळवार आणि संदीप तळवार यांनी अरुण तळवार यांच्या दुचाकीवर दगडफेक करून वाहनाचे मोठे नुकसान केले. आरोपींनी घरात घुसून धुमाकूळ घातल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
अरुण तळवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिरेबागेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सध्या फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. गावातील किरकोळ वादांमुळे अशा हिंसक घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Recent Comments