Chikkodi

चिक्कोडी शहराच्या विकासासाठी १४.४८ कोटींचा निधी मंजूर

Share

चिक्कोडी शहरात विविध प्रभागांतील रस्ते, गटारी आणि मूलभूत सुविधांसाठी १४ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार गणेश हुक्केरी यांनी आज शहराच्या विविध भागात ३ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे भूमिपूजन करून विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश हुक्केरी यांनी सांगितले की, नवी दिल्लीतील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवकांच्या मागणीनुसार हा निधी उपलब्ध झाला आहे. झारी गल्ली, विठ्ठल दामोदर नगर, आर.के. कॉलनी, साई मंदिर आणि हुडको कॉलनी या भागातील कामांना प्राधान्य देण्यात आले असून, पारदर्शक पद्धतीने ही कामे पूर्ण केली जातील.

शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील सावरकर नगरमध्ये ५७ लाख, प्रभाग १३ आणि २१ मधील गणेशनगर भागात ६७ लाख, तर प्रभाग २२ मधील हरी नगर आणि महावीर नगरमध्ये ५४ लाख रुपयांची कामे होणार आहेत. तसेच नवीन नगरपालिका कार्यालय परिसर आणि कवटगीमठ नगरमध्ये ६३ लाख आणि भीम नगरमध्ये ५० लाख रुपयांच्या रस्ते व गटारींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. शहराच्या मुख्य बसवेश्वर चौकामध्ये पादचारी मार्ग, ट्रॅफिक सिग्नल आणि पथदिव्यांसाठी ४.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच बसस्थानक ते जुनी नगरपालिका आणि के.सी. रोड ते निपाणी-मुधोळ रस्त्यापर्यंतच्या विद्युतीकरण व फूटपाथच्या कामासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले असून, ही कामे लवकरच सुरू होतील, असे गणेश हुक्केरी यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामा माने, प्रभाकर कोरे, गुलाब बागवान यांच्यासह नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जगदीश ईटी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: