मतदार यादीच्या सुधारणेसाठी ‘एसआयआर’ प्रक्रिया राबवण्यात येत असून बेळगाव दक्षिण मतदारसंघातील मतदारांनी आपले नाव बीएलओ ॲपवर मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन नोडल अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळ्ळी यांनी केले आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या दक्षिण मतदारसंघाचे नोडल अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळ्ळी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या नवीन नियमावलीबाबत माहिती दिली. केवळ भारतीय नागरिकांनाच मतदानाचा हक्क मिळावा, याची खात्री करण्यासाठी दर २० वर्षांनी ‘एसआयआर’ सर्वेक्षण केले जाते. या प्रक्रियेचा भाग म्हणून मतदार यादीतील प्रत्येक व्यक्तीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) भेट घेऊन नाव मॅपिंग करून घेणे बंधनकारक आहे. विशेषतः २००२ नंतर ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत, त्यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.
पुढील महिन्यापासून ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होण्याची शक्यता असून मतदारांनी बीएलओ ॲपच्या माध्यमातून ‘मॅप’, ‘प्रोजेनी’ आणि ‘सेल्फ प्रोजेनी’ यांसारखे तपशील अपडेट करून घ्यावेत. ज्यांची नावे २००२ पूर्वीपासून यादीत आहेत आणि ज्यांनी यापूर्वीच एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली आहे, ते थेट मॅपिंग करू शकतात. नागरिकांनी कोणत्याही गोंधळाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी, असे डॉ. सिद्धू हुल्लोळ्ळी यांनी म्हटले आहे.


Recent Comments