धारवाड तालुक्यातील अम्मिनभावी गावात गुढीपाडव्याच्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या केली.
सणासुदीच्या दिवशीच घडलेल्या या रक्ताळलेल्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
धारवाड तालुक्यातील अम्मिनभावी गावात आज सकाळीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. संपूर्ण गाव गुढीपाडव्याच्या उत्साहात असताना, शिवलीला संगोळी या ३५ वर्षीय महिलेचा तिच्याच भावाने खून केला. कुटुंबाच्या सहा एकर जमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचा शेवट आज हत्येने झाला.
मृत शिवलीला आणि आरोपी हनुमंत यलिवाळ हे दोघे बहीण-भाऊ होते. जमिनीच्या वाटणीवरून त्यांच्यात सतत खटके उडत होते. आज गुढीपाडव्यानिमित्त शेतात भूमीपूजन करण्यासाठी हे दोन्ही भावंडे शेतात गेली होती. मात्र, तिथे पुन्हा जमिनीच्या हिशावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
बहिणीच्या बोलण्याने संतापलेल्या हनुमंतने आपल्याजवळील धारदार शस्त्राने शिवलीलावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे शिवलीला यांचा जागीच मृत्यू झाला. सणाच्या दिवशीच शेतात हा रक्तरंजित प्रकार घडल्याने ग्रामस्थ हादरून गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
सध्या धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी हनुमंतचा शोध सुरू आहे.


Recent Comments