Belagavi

मच्छे औद्योगिक परिसरात मटका खेळणाऱ्या बुकीसह एकाला अटक

Share

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या मच्छे आणि पिरनवाडी परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत मटका जुगार आणि गांजा सेवन करणाऱ्या एकूण चार आरोपींना अटक केली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१६ मार्च रोजी मच्छे औद्योगिक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी विनायक बाळाराम पाटील (रा. बेळगाव) आणि रामप्पा चौगला या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका कारवाईत, मच्छे गावातील सार्वजनिक ठिकाणी अस्वाभाविक वर्तन करणाऱ्या रोहित बसवराज मुतगेकर (रा. पिरनवाडी ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय लक्कप्पा जोडट्टी आणि त्यांच्या पथकाने संशयावरून त्याची चौकशी केली असता त्याने अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड झाले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे, पिरनवाडी येथील प्रकाश निरुपादी जकबाळ हा तरुणही मच्छे परिसरात गांजा सेवन करून फिरताना आढळल्याने पीएसआय संतोष दळवाई यांनी त्याला अटक केली.

या तिन्ही प्रकरणांतील चारही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या या तत्परतेबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Tags: