BENGALURU

बेंगळुरूच्या ग्रेस कोचिंग सेंटरमध्ये युपीएससी यशवंतांचा गौरव

Share

जीवनात कठोर परिश्रम केल्यास देव नक्कीच फळ देतो. परिश्रमाची किंमत कधीही वाया जात नाही, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे. बेंगळुरू येथील चंद्रा लेआउटमधील ‘ग्रेस आयएएस कोचिंग सेंटर’मध्ये २०२५ च्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा सत्कार करताना त्या बोलत होत्या.

युपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रत्येक उमेदवारामागे एक संघर्षाची गाथा असते. आयएएस किंवा केएएस परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे काम नाही. या कठीण परीक्षेत यश मिळवलेले सर्व उमेदवार इतरांसाठी आदर्श आहेत, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले. कर्नाटकात प्रथम आलेल्या किरण कमते यांनी त्यांच्या शेवटच्या प्रयत्नात मिळवलेले यश हे सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या यशात पालकांचे स्वप्न आणि कोचिंग सेंटरचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

राजकारणी आणि अधिकारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी समन्वयाने काम केल्यास सरकारी योजना सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचवता येतात. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात संवेदनशील आणि प्रामाणिक राहून काम करावे, जेणेकरून ते लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान ठरू शकतील, असा सल्ला लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी दिला.

स्वतःच्या राजकीय प्रवासाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, यश मिळवण्यासाठी चिकाटी आवश्यक आहे. २००६ पासून जिल्हा पंचायत आणि कॉर्पोरेशन निवडणुकांमध्ये मला संधी मिळाली नाही. २०१३ आणि २०१४ च्या निवडणुकांमध्ये माझा थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला. मात्र, सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे २०१८ मध्ये ५२ हजार आणि २०२३ मध्ये ५८ हजार मतांच्या फरकाने मी विजयी झाले. आज मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री म्हणून मी कार्यरत आहे, हे केवळ वारंवार केलेल्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे, अशी भावना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, प्राप्तिकर आयुक्त शिवानंद कलकेरी, ग्रेस आयएएस संस्थेचे संचालक नवीन कुमार आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: