केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम-श्री’ योजनेअंतर्गत बेळगाव लोकसभा मतदारसंघातील २८ सरकारी शाळांची अत्याधुनिक आणि आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी दिली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिल्याचे राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी सांगितले. यामध्ये २१ प्राथमिक, ६ माध्यमिक आणि १ पदवीपूर्व शाळेचा समावेश असून, या शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये प्रामुख्याने मूडलगी तालुक्यातील कलोळी, पटगुंदी, अरळीमट्टी; गोकाकचे पदवीपूर्व महाविद्यालय, बेनचिनमरडी; सौंदत्तीमधील मरकुंबी, अलदकट्टी, शिरसंगी, मुनवल्ली; बैलहोंगलचे इंदिरा नगर, बेलवडी आणि बेळगाव तालुक्यातील खानागाव बी.के., मच्छे, उचगाव, सांबरा, मुतगा व वडगाव येथील कर्नाटक पब्लिक स्कूलचा समावेश आहे. या शाळांच्या कायापालटासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये ६ स्मार्ट क्लासरूमसाठी ३० लाख रुपये, ३ विज्ञान प्रयोगशाळांसाठी ५२.८० लाख रुपये आणि ११ ग्रंथालयांच्या विकासासाठी ५२.८० लाख रुपयांचा समावेश आहे. तसेच ६ शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी २९.५२ लाख रुपये देण्यात आले आहेत.
केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर या शाळांना ‘ग्रीन स्कूल’ म्हणून विकसित करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि कचरा व्यवस्थापन राबवले जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी येथे ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी सारखे व्यावसायिक कोर्सेसही सुरू केले जाणार आहेत. या शाळा भविष्यात जिल्ह्याचे ‘एक्सीलन्स सेंटर’ म्हणून ग्रामीण भागातील इतर शाळांसाठी दीपस्तंभ ठरतील, असा विश्वास खासदार कडाडी यांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments