कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील सीमावाद सर्वश्रुत असला, तरी धार्मिक पातळीवर विजापूर आणि सांगलीचे नाते आजही अतूट आहे. गेल्या ५०० वर्षांपासून महाराष्ट्रातील देवासाठी विजापूरमधील हुगार घराण्याकडूनच फुलांचा पुरवठा केला जातो.

विजापूर शहरातील शास्त्री नगरमधील प्रकाश हुगार यांच्या घराण्याला हा ऐतिहासिक मान मिळाला आहे. सन १५५४ पासून या घराण्याकडे महाराष्ट्रातील देवासाठी लागणारी विशेष फुले, बाशिंगे आणि पूजेचे साहित्य तयार करण्याची जबाबदारी आहे. नैसर्गिक आणि कागदी फुलांपासून बनवलेले हे साहित्य घेण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविक महाराष्ट्रातून विजापूरला येतात असे प्रकाश हुगार यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील घोरपडी ग्रामपंचायत हद्दीत प्रसिद्ध मल्लुदेवीचे मंदिर आहे. युगादी (गुढीपाडवा) निमित्त या देवीची मोठी जत्रा भरते. या जत्रेसाठी लागणारी कागदी फुले, बाशिंगे आणि इतर पूजेचे साहित्य घेण्यासाठी अमावस्येच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातील शेकडो भाविक १०० किलोमीटरची पदयात्रा करून विजापूरला पोहोचतात. येथे हुगार कुटुंबाकडून या भाविकांचे जंगी स्वागत आणि आतिथ्य केले जाते. त्यानंतर येथील पूजेचे साहित्य घेऊन भाविक पुन्हा पायी महाराष्ट्राकडे रवाना होतात.
वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत भाषा, प्रांत किंवा सीमावाद कधीच अडथळा ठरला नाही. राज्याच्या सीमा वेगळ्या असल्या तरी श्रद्धेचा हा पूल गेल्या पाच शतकांपासून दोन्ही राज्यांना जोडून ठेवत आहे. युगादी आणि मल्लुदेवीच्या जत्रेसाठी हुगार घराण्यातील फुले असणे हा एक अलिखित नियमच बनला असून, आजही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने पाळली जात आहे.


Recent Comments