Belagavi

बेळगाव महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार

Share

बेळगाव महापालिकेच्या सत्तेसाठी भाजपने मोर्चेबांधणी पूर्ण केली असून जातीच्या समीकरणांचा आधार घेत विजयाची रणनीती आखली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झाली असून आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

बेळगाव महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप नेत्यांनी मास्टर प्लॅन तयार केला असून विणकर समाजाच्या प्रीती कामकर यांना महापौर, तर लिंगायत समाजाच्या हनुमंत कोंगाळी यांना उपमहापौर पद देण्याचे निश्चित केले आहे. बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांचा समतोल राखण्यासाठी आमदार अभय पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी हे जातीचे समीकरण जुळवले आहे. काँग्रेसच्या वतीने खर्शीद मुल्ला आणि मोदिनसाब मतवाले यांनी अर्ज दाखल केले असले तरी, भाजपच्या ३८ सदस्यांच्या संख्याबळासमोर विरोधी पक्षाचे प्रयत्न अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

दुपारी १ वाजता हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडणार असून ५८ सदस्य असलेल्या महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि व्होट बँक लक्षात घेऊन भाजप नेत्यांनी सामाजिक न्यायाच्या नावाखाली ही निवड केल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या या रणनीतीमुळे काँग्रेस गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Tags: