विजापूर जिल्हा पोलिसांनी पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी करत आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या असून सव्वा कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विजापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुद्देबिहाळ, बसवन बागेवाडी, निडगुंदी, ताळीकोटी आणि कुडगी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या एकूण २२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून ३६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १.२७ कोटी रुपये किमतीचे सोने-चांदी, १७ दुचाकी आणि २ कार हस्तगत केल्याचे लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.

या टोळीने मुद्देबिहाळ मधील आरटीओ जयराम नायक यांच्या शेतघरातून २५० ग्रॅम सोने, ३ किलो चांदी आणि ४.३० लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. २१ जानेवारी रोजी नेबगेरी एलटी मध्ये झालेल्या चोरीचा धागा पकडून पोलिसांनी रायचूर येथील गुरुराज, गुरुकुमार आणि सय्यद अस्लम या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५१ लाखांच्या मुद्देमालासह एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती जयराम नायक यांनी दिली.

एकूणच बसवन बागेवाडी उपविभागात २०२५-२०२६ या वर्षात घडलेल्या २२ विविध चोरीच्या प्रकरणांचा छडा लावत पोलिसांनी ३६ आरोपींना गजाआड केले आहे. विजापूर पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments