Belagavi

बनावट नोटांच्या गुन्ह्यातील चार आरोपींना २७ मार्चपर्यंत कोठडी

Share

बेळगावमध्ये बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना जेएमएफसी न्यायालयाने २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या ४ आंतरराज्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हसुवा, बक्षी श्रवणकुमार, अरबाज उर्फ रुपेश मोहम्मद वाठोड आणि टुनटुन उर्फ आदिल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी मूळचे गोवा आणि बिहार राज्यातील रहिवासी असून सध्या गोव्यात वास्तव्यास होते.

दिनांक १६ मार्च २०२६ रोजी बेळगावमधील खडेबाजार रोडवरील एका दुकानदाराने पोलिसांना माहिती दिली की, चार व्यक्ती दुकानात सामान खरेदी करण्यासाठी आले असून त्यांनी ५०० रुपयांच्या नोटा दिल्या आहेत, ज्या बनावट असल्याचा संशय आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण भरमणी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस निरीक्षक जे. एम. कालमिर्ची, पीएसआय हुसेनसाब केरूर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. बेळगावमधील जुन्या पीबी रोडवरील बाण मार्केटजवळ एका स्विफ्ट कारमधून या चारही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या ४९५ बनावट नोटा, चार मोबाईल संच, ३ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मार्केट पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले आहे.

Tags: