बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.


या टोळीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गोकाकच्या श्रीनगरमधील एका घरात पैसे चारपट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोकाक शहर पोलिसांनी तिथे छापा टाकला. या कारवाईत परशुराम भीमशी बडकरी, इम्रान बाबाजान जुनेदी, जयश्री बाबू कांबळे, मनीषा राजू गायकवाड, उज्वला तुळशीराम बिलाने आणि महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी अनंत प्रकाश नरवाडे व दिलदार रब्बानी शेख यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी पांढऱ्या कागदाला काळा रंग लावून ते अस्सल नोटा असल्याचे भासवून लोकांची लूट करत होते.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी, डीवायएसपी रवी नाईकडी आणि सीपीआय सुरेशबाबू आर.बी. यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली. गोकाक शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण मोहिते आणि त्यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून नोटा छापण्याचे मशीन, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय निखिल कांबळे करत आहेत.
या आंतरराज्य टोळीतील सर्व आरोपींविरुद्ध गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पदाचा गैरवापर करून जनतेची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे सर्वत्र खळबळ माजली असून, या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे.


Recent Comments