बेळगावमधील कराटे क्रीडा क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे. बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनने आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.


या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे सचिव जितेंद्र काकतीकर यांनी महत्त्वाची घोषणा केली. बेळगाव जिल्ह्यात कराटे खेळाला चालना देणे आणि खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही संघटनात्मक रचना मजबूत करण्यात आली आहे. ‘अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन’ आणि ‘कराटे इंडिया ऑर्गनायझेशन’ ची मान्यता असलेल्या असोसिएशनने जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षणात गुणवत्ता आणि शिस्त राखण्यासाठी कटिबद्धता दर्शवली आहे. जिल्ह्यातील सर्व कराटे प्रशिक्षण केंद्रे आणि अकादमींनी या असोसिएशनशी जोडले जावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्षपदी राघवेंद्र हंगल, विनायक मोरे (शहर) आणि परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर (ग्रामीण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तांत्रिक आयोगासाठी भूषण पाटील, शाहीर शेख, तर पंच आयोगासाठी अमित वसने, चंदन जोशी, लक्ष्मण नायक यांची निवड करण्यात आली आहे.
क्रीडा प्रशिक्षक म्हणून अक्षय पारमोजी, हरीश सोनार (पुरुष विभाग) आणि नताशा आशाटेकर, प्रगती कमल (महिला विभाग) यांची नियुक्ती झाली आहे. यासोबतच बैलहोंगल, सवदत्ती, गोकाक आणि खानापूर या तालुक्यांसाठीही समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


Recent Comments