Belagavi

बेळगाव: आरएलएस महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘मूट कोर्ट’ स्पर्धेचे उद्घाटन

Share

बेळगावमधील प्रतिष्ठित राजा लखमगौडा विधी महाविद्यालयात चार दिवस चालणाऱ्या ‘एम. के. नांबियार राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धेला’ उत्साहात सुरुवात झाली आहे.

राजा लखमगौडा विधी महाविद्यालयात आयोजित या स्पर्धेसाठी शनिवारी सायंकाळी उद्घाटन सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम. ज्योती यांनी, मूट कोर्ट स्पर्धा ही विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. मूट कोर्ट ही कायद्याच्या शिस्तीवर आधारित एक महत्त्वाची शैक्षणिक प्रक्रिया आहे. यामुळे कायद्याची सैद्धांतिक समज वाढते आणि कायदेशीर युक्तिवादाची ओढ निर्माण होते. निष्पक्ष युक्तिवाद आणि सखोल संशोधनामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते, असे उद्घाटनपर भाषणात न्यायमूर्ती एम. ज्योती म्हणाल्या.

ज्येष्ठ वकील प्रदीप सावकार यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की, मूट कोर्ट स्पर्धांमुळे कायद्याचे सखोल अध्ययन आणि व्यावसायिक सन्मान वाढवण्यास मदत होते. या सोहळ्यादरम्यान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वकिलांचा गौरवही करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ वकील ए. के. तगारे, प्रदीप सावकार, आर. एस. मुतालिक, व्ही. एन. देशपांडे, एस. व्ही. गणाचारी यांच्यासह उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील अनेक मान्यवर वकील उपस्थित होते. या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधून विधी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या ३० विद्यार्थ्यांच्या संघांनी सहभाग नोंदवला आहे.

Tags: