राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बेळगावमधील येळ्ळूर येथील ५ एकर परिसरात उभारले जाणार असून, त्यासाठी आमदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केली.


बेळगावमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक’ आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. आमदार अभय पाटील, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि सभागृह नेते हनुमंत कोंगाली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फुगे सोडून या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

बेळगावच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर चषक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका केवळ रस्ते आणि गटारांच्या विकासापुरती मर्यादित नसून, दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. बेळगावमध्ये फुटबॉलची क्रेझ वाढत असून, खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी रुपये जाहीर करत असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. कर्नाटक राज्यातील अशा प्रकारचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येळ्ळूरमध्ये ५ एकर जागेवर उभारणार असल्याचे अभय पाटील यांनी म्हटले.

आमदार अभय पाटील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलासाठी केलेल्या घोषणेबद्दल महापौर मंगेश पवार यांनी त्यांचे आभार मानले. महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून बेळगावमधील उदयोन्मुख खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे आयोजन करून खेळाडूंना अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मंगेश पवार यांनी सांगितले.

युवकांनी शिक्षणासोबतच खेळाच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ ठेवावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अभय पाटील यांनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानाच्या उभारणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.

या उद्घाटन समारंभाला महानगरपालिका सदस्य गिरीश धोंगडी, श्रेयस नाकाडी, आनंद चव्हाण, रमेश मैल्यागोळ यांच्यासह विविध महाविद्यालयांचे संघ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments