जोल्ले शिक्षण संस्थेच्या वतीने ‘शशिकला जोल्ले शिष्यवृत्ती’ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत एकूण ४० पात्र विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित केली जाणार असल्याची माहिती जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी दिली.

निपाणी येथील जोल्ले शिक्षण संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत बसवप्रसाद जोल्ले बोलत होते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे.
गेल्या वर्षी २० विद्यार्थ्यांना ६४ लाख रुपयांची मदत देण्यात आली होती, यंदा ही रक्कम १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत पहिल्या १० विद्यार्थ्यांना १०० टक्के, ११ ते २० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के, २१ ते ३० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के आणि ३१ ते ४० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना २५ टक्के शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार आहे.
जानेवारी महिन्यात पार पडलेल्या या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या पहिल्या १० विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची पूर्ण सवलत दिली जाईल. अन्य विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार १.५० लाख ते ५० हजार रुपयांपर्यंतची सवलत शैक्षणिक वर्षात विभागून दिली जाणार आहे, असे बसवप्रसाद जोल्ले यांनी म्हटले.
या पत्रकार परिषदेला प्रशासकीय अधिकारी एम. एम. पाटील, प्राचार्य दीपक पाटील यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments