Belagavi

शहापूर-वडगाव मुख्य रस्त्याला देवरा दासीमय्या यांचे नाव देण्याची मागणी

Share

शहापूर ते वडगाव या मुख्य रस्त्याला आद्य वचनकार श्री देवरा दासीमय्या यांचे नाव देण्यात यावे, या गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

बेळगाव जिल्हा विणकर संघटनेच्या वतीने आज शहरातील या प्रमुख रस्त्याच्या नामकरणासंदर्भात अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांची भेट घेण्यात आली. वडगाव, भारत नगर, खासबाग आणि जुने बेळगाव परिसरात ४० हजारांहून अधिक विणकर बांधव वास्तव्यास असून, आपल्या समाजाचे आराध्य दैवत श्री देवरा दासीमय्या यांचा सन्मान व्हावा, अशी मागणी यावेळी लावून धरली.

शहापूर ते वडगाव या मुख्य रस्त्याला अद्याप कोणतेही अधिकृत नाव दिलेले नाही. त्यामुळे दक्षिण मतदारसंघाचे आमदार, महापौर आणि महापालिका सदस्यांनी विशेष सभेमध्ये तातडीने ठराव मंजूर करून या रस्त्याला आद्य वचनकारांचे नाव द्यावे, अशी मागणी विनायक ताळूकर यांनी व्यक्त केली.

यावेळी आनंद लोकरी, सिद्धप्पा सुगंधी, मल्लाप्पा सोनटक्की, हनुमंत बुचडी, उदय वाकर, गुरुराज कळीमणी यांच्यासह विणकर समाजातील इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: