बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने ११५८ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना हार्डवेअरचे वितरण केले असून, त्यापैकी १००४ संस्थांना सॉफ्टवेअरची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ईरण्णा कडाडी यांनी बेळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या आधुनिकीकरणाबाबत प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील ७४३ कृषी सोसायट्या आता ‘सामान्य सेवा केंद्र’ (सीएससी) म्हणून कार्यरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना बँकिंग व्यवहारांसोबतच विविध सरकारी सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तसेच, आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी पहिल्या टप्प्यात बेळगाव डीसीसी बँकेमार्फत १०० सोसायट्यांना मायक्रो-एटीएम सुविधा पुरवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना खते आणि कृषी साधने एकाच छताखाली मिळावीत यासाठी जिल्ह्यातील २०० सोसायट्या ‘किसान समृद्धी केंद्र’ म्हणून विकसित करण्यात आल्या आहेत. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६५ सोसायट्यांना गोदामांच्या बांधकामासाठी डीसीसी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
डिजिटल क्रांतीच्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व ११५८ सोसायट्यांच्या कर्मचाऱ्यांना डिजिटल अकाउंटिंग आणि आर्थिक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सहकारी क्षेत्राच्या या डिजिटलीकरणामुळे शेतकऱ्यांना बँकिंग आणि कृषी सेवा स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया खासदार ईरण्णा कडाडी यांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments