बेळगाव येथील एस निजलिंगप्पा साखर संस्थेत साखर कारखान्यांच्या प्रयोगशाळांना एन ए बी एल मानांकन मिळवून देण्यासाठी आणि साखर उद्योगात नवीन सॉफ्टवेअर प्रणाली लागू करण्यासाठी विशेष कार्यशाळा पार पडली.


साखर आयुक्तालय बंगळुरू आणि एस निजलिंगप्पा साखर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या गुणवत्ता यात्रा जनजागृती सत्राचे आयोजन १० मार्च रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ऊस विकास आयुक्त आणि साखर संचालक गोविंद रेड्डी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यावेळी बोलताना गोविंद रेड्डी यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रयोगशाळांना एन ए बी एल मानांकन मिळवणे किती अनिवार्य आहे, यावर भर दिला. या मानांकनामुळे साखर कारखान्यातील प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि शेतकरी तसेच कारखाना मालक यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यासोबतच साखर कारखान्यांचा दैनंदिन अहवाल ऑनलाईन भरण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर प्रणालीबाबतही माहिती देण्यात आली. देवनेट सोल्युशन्सच्या वतीने डेटा एन्ट्रीच्या सोप्या पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तांत्रिक सल्लागार वेणुगोपाल यांनी एन ए बी एल मानांकनामुळे साखरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि इतर राज्यांत कशी मोठी मागणी मिळू शकते, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत राज्यातील विविध साखर कारखान्यांमधून ११० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. एस निजलिंगप्पा साखर संस्थेचे संचालक राजगोपाल यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले, तर तांत्रिक सल्लागार सी बी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वृषभ अस्ती यांनी केले.


Recent Comments