धारवाडच्या जन्नत नगर कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला असून, गेल्या तीन दिवसांपासून नागरिक श्वसनाच्या त्रासाने हैराण झाले आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त रहिवाशांनी आता पालकमंत्री संतोष लाड यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गेल्या चार-पाच दशकांपासून शहराबाहेर असलेला जन्नत नगर कचरा डेपो आता वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या मध्यभागी आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणच्या कचऱ्याला मोठ्या प्रमाणावर आग लागत आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवून गेल्यानंतर काही तासांतच पुन्हा आग भडकते, ज्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे. या धुरामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना दमा, हृदयविकार आणि श्वसनाचे गंभीर त्रास जाणवू लागले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने केली, तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली आहे.
काल दुपारी अग्निशमन दलाने आग विझवली होती, मात्र मध्यरात्री पुन्हा काही समाजकंटकांनी कचऱ्याला आग लावल्याने जन्नत नगर, होसयल्लापूर, टोल नाका यांसह पाचहून अधिक उपनगरांमध्ये धुराचे साम्राज्य पसरले आहे. अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी नागरिक पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता तरी जिल्हा प्रशासन आणि महापालिका हा कचरा डेपो अन्यत्र हलवून नागरिकांना या त्रासातून मुक्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments