Belagavi

बेळगावात सोशल मीडियाद्वारे हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Share

बेळगावमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या टोळीचा टिळकवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फॅशन डिझायनर महिलेने साथीदारासह रचलेला हा हनीट्रॅपचा डाव पोलिसांनी उधळून लावला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

बेळगावमधील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. बागलकोट येथील ३३ वर्षीय दीपा अवटगी आणि हुक्केरी येथील शिवानंद मठपती अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दीपा ही सोशल मीडियावरून श्रीमंत व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना बेळगावमधील एका लॉजवर भेटीसाठी बोलावून घेत असे.

लॉजवर आलेल्या व्यक्तीला संबंधित महिला स्नानगृहात पाठवून बाहेरून दरवाजा लॉक करत असे. त्यानंतर त्या व्यक्तीकडील रोख रक्कम, मोबाईल आणि कारची चावी घेऊन आरोपी फरार होत असत. या कृत्याचे सीसीटीव्ही चित्रण प्राप्त झाले असून, तक्रार दाखल होताच टिळकवाडी पोलिसांनी दीपा अवटगी हिला अटक केली आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ३२ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात फॉर्च्युनर कार, मारुती एस-क्रॉस, ११ मोबाईल आणि रोख रकमेचा समावेश आहे. दीपा अवटगी हिला जामिनावर मुक्त करण्यात आले असून, फरार आरोपी शिवानंद मठपती याचा पोलीस शोध घेत आहेत.

Tags: