कॅन्टोन्मेंट बोर्डाने बांधलेल्या नवीन फूल मार्केटच्या गाळ्यांवरून आज बोर्डाच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला. खासदार जगदीश शेट्टर यांनी या बांधकामावर तीव्र आक्षेप घेत हे गाळे नियमबाह्य असल्याचे म्हटले आणि ते त्वरित हटवण्याची मागणी केली.


कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारात झालेल्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी फूल मार्केटच्या बांधकामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “हे गाळे नियमांचे उल्लंघन करून आणि कायद्याला धरून नसलेल्या जागेवर बांधण्यात आले आहेत,” असा आरोप करत शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हे अतिक्रमण त्वरित हटवून जागा मोकळी करावी, असा पवित्रा त्यांनी बैठकीत घेतला.
खासदारांच्या या आक्षेपावर उत्तर देताना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोर्डाची बाजू मांडली. “आम्ही मार्केटचे बांधकाम कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता कायदेशीर चौकटीत राहूनच केले आहे. त्यामुळे हे गाळे हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी खासदारांच्या मागणीला विरोध दर्शवला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर, सीईओ आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. मार्केटच्या कायदेशीर वैधतेवरून बैठकीत बराच वेळ खडाजंगी आणि चर्चा पाहायला मिळाली.


Recent Comments