DEATH

हलगा येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आधारस्तंभ ‘धाकलू काका’ अनंतात विलीन

Share

बेळगाव तालुक्यातील हलगा गावचे ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते धाकलू फकीरा बिळगोजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावात सर्वधर्मीय सलोखा जपणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

हलगा येथील प्रगतशील शेतकरी आणि मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष धाकलू फकीरा बिळगोजी (८८) यांचे निधन झाले. गेल्या ६० वर्षांपासून ते हजरत बीबी फातिमा दर्ग्याचे मुख्य सेवक म्हणून कार्यरत होते. गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यांत त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन चालण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना गावात आदराचे स्थान होते.

गावातील प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणारे धाकलू काका हलगा पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण हलगा गावावर शोककळा पसरली असून अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील बांधवांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मृताच्या स्मरणार्थ सोमवारी सकाळी ८ वाजता हलगा येथील स्मशानभूमीत अस्थी विसर्जन कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांनी धाकलू काकांच्या आठवणींना उजाळा दिला.

Tags: