विजापूर जिल्ह्यातील आलमेल आणि इंडी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने पळवण्याच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी दोन विशेष तपास पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पुण्याचा दीपक परशुराम माळी आणि मूळचा कलुबर्गीचा असलेला मात्र सध्या पुण्यात राहणारा प्रकाश रामचंद्र मातंगी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. या कारवाईमुळे साखळी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Recent Comments