Belagavi

बेळगावात रंगोत्सवाचा जल्लोष

Share

बेळगाव शहरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘होळी मिलन’ कार्यक्रमासह शहरातील विविध भागांत रंगांची मोठी उधळण पाहायला मिळाली.

बेळगावच्या रंगपंचमीची ख्याती आता जागतिक स्तरावर पोहोचली असून गल्लोगल्ली नागरिक रंगात न्हाऊन निघाले होते. व्हॅक्सीन डेपो मैदानावर आयोजित ‘होळी मिलन’ कार्यक्रमात हजारो तरुण-तरुणींनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला. विशेष म्हणजे, या सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी परदेशी पत्रकारही बेळगावात दाखल झाले होते.

गेल्या १५ वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन करणारे आमदार अभय पाटील यांनी यावेळी नागरिकांचे कौतुक केले. बेळगावच्या रंगपंचमीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचे श्रेय येथील जनतेचे असून संपूर्ण देश या उत्सवाची वाट पाहत असतो, असे अभय पाटील यांनी म्हटले.

यंदा ग्रहणाचे कोणतेही सावट नसल्याने नागरिकांनी मुक्त वातावरणात रंगांचा आनंद लुटला. दुसरीकडे, पांगुळ गल्लीतील ऐतिहासिक श्री अश्वत्थामा मंदिरात पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा झाला. नवस पूर्ण करण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात लोटांगण सोहळ्यात सहभाग घेतला.

Tags: