परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी आपली क्षमता सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी असते. या संधीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ उठवून जीवनात प्रगती करावी, असे आवाहन चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केले.


चिक्कोडी येथील परटी नागलिंगेश्वर कल्याण मंडपात आयोजित जिल्हास्तरीय ‘एसएसएलसी’ विद्यार्थ्यांच्या एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. मुले ही देशाची खरी संपत्ती आहेत. विद्यार्थी दशेत अभ्यासाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. केवळ गुणांसाठी अभ्यास न करता, सातत्यपूर्ण अभ्यासाने समाजात उच्च स्थान मिळवण्यावर भर द्यावा. पालकांनी आणि शिक्षकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करून समाजासाठी मोलाचे योगदान देण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगावी, असेही त्या म्हणाल्या.

चिक्कोडीचे डीडीपीआय आर. एस. सीतारामू यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, परीक्षा म्हणजे सणासारखी आहे, ती विद्यार्थ्यांनी आनंदाने दिली पाहिजे. खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करून एक आदर्श पाऊल उचलले आहे.
या कार्यशाळेत तज्ज्ञांनी ‘परीक्षेची भीती आणि तणाव व्यवस्थापन’, ‘प्रभावी अभ्यास पद्धती’, ‘मानसिक आरोग्य’ आणि ‘गणित विषयातील महत्त्वाचे मुद्दे’ यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिक्कोडी बीईओ प्रभावती पाटील यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments