Belagavi

बेळगावच्या सीमा लढ्याची गाथा आता रुपेरी पडद्यावर येणार

Share

बेळगावचा सीमा लढा आणि मराठी शाळांचे अस्तित्व आता चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यक्रमात दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सीमा प्रश्नावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली. यामुळे सीमाभागातील मराठी भाषेच्या संघर्षाला आता कलात्मक व्यासपीठ मिळणार आहे.

बेळगाव येथील मराठा मंदिरमध्ये आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात हेमंत ढोमे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सीमाभागातील मराठी शाळांचे अस्तित्व आणि भाषा संवर्धनावर भाष्य केले. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जगभरात उच्च पदांवर कार्यरत आहेत, अशी आठवण हेमंत ढोमे यांनी करून दिली. मात्र, इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी आणि कन्नडसारख्या स्थानिक भाषांच्या शाळांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

बेळगावचा सीमा लढा हा लोकशाही मार्गाने चाललेला जगातील सर्वात प्रदीर्घ लढा आहे, असे हेमंत ढोमे यांनी म्हटले. या संघर्षाची पार्श्वभूमी आणि येथील वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा लहेजा असलेला चित्रपट तयार करून तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात एसएससी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि बेळगाव तसेच खानापूर तालुक्यातील आदर्श शाळांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Tags: