कॉलेज रोडवरील सीआरएच रुग्णालयात संजीवनी फाउंडेशनच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयलक्ष्मी देसाई यांनी ‘स्व-काळजी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, रुग्णांची सेवा करत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना वैयक्तिक आरोग्य आणि कामाचा ताण यामध्ये संतुलन कसे राखावे, याच्या उपयुक्त टिप्स त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वप्ना महाजन, डॉ. सुचित्रा लाटकर, डॉ. रेश्मा कामते, डॉ. ज्योती गिणीमुगी आणि रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. रेणुका पाटील उपस्थित होत्या. संजीवनी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत या सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेश्मा कामते यांनी संजीवनी फाउंडेशनच्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या सामाजिक कार्याला नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित सर्व महिलांसाठी पारंपारिक हळदी-कुंकू समारंभ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजक खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.
रुग्णसेवा करताना स्वतःला विसरू नका, हा संदेश या कार्यक्रमातून सर्वांपर्यंत पोहोचल्याचे पद्मा औशेकर यांनी म्हटले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा काटे यांनी केले, तर पद्मा औशेकर यांनी आभार मानले. सीआरएच रुग्णालयातील सर्व महिला कर्मचारी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Recent Comments