जागतिक स्तरावर सेवाकार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी इंटरनॅशनलने आता ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘कामधेनु’ योजना सुरू केली आहे. संस्थेचे संचालक के.पी. नागेश यांनी बेळगाव दौऱ्यादरम्यान रोटरीच्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.


रोटरी क्लबला १२९ वर्षे पूर्ण झाली असून, ही संस्था सरकारच्या खांद्याला खांदा लावून लोकोपयोगी कामे करत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना केएमएफच्या (KMF) माध्यमातून दुभत्या गाई उपलब्ध करून देण्यासाठी ‘कामधेनु’ योजना राबवली जात आहे. या योजनेनुसार, गायीपासून होणारे पहिले वासरू दुसऱ्या गरजू महिलेला भेट दिले जाते, ज्यामुळे ही साखळी निरंतर सुरू राहते. दुसऱ्या एका उपक्रमात, गाय खरेदीसाठी केएमएफ आणि रोटरी प्रत्येकी ३० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय, इन्फोसिससारख्या कंपन्यांकडून जुने संगणक घेऊन त्यांची दुरुस्ती करून सरकारी शाळांतील मुलांना संगणक प्रशिक्षण दिले जात आहे. रवी शंकर डकोजी यांच्या ५०० कोटींच्या निधीतून आणि रोटरीच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनाचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये वन्यप्राण्यांसाठी बोअरवेलद्वारे पाण्याची सोय, पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कोटींच्या संख्येने वृक्षारोपण अशा योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments