Belagavi

बेळगावच्या दिव्यांग जलतरणपटूंची गगनभरारी

Share

अपंगत्व हे यशाच्या मार्गातील अडथळा नाही, हे बेळगावच्या मुलांनी सिद्ध केले आहे. स्विमर्स क्लब आणि अ‍ॅक्वेरियस क्लबच्या वतीने आयोजित २४ व्या मोफत जलतरण शिबिरामुळे शेकडो मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

बेळगाव येथील केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलांच्या मोफत जलतरण शिबिराची सांगता झाली. अंधत्व, शारीरिक अपंगत्व आणि मतिमंदत्व अशा आव्हानांवर मात करत २२० हून अधिक मुलांनी पोहण्याचे कौशल्य आत्मसात केले. या शिबिराने आजवर देशाला ९ आंतरराष्ट्रीय पॅरा-जलतरणपटू दिले असून त्यांनी ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

सांगता समारंभाला मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन उपस्थित होते. जलतरण ही केवळ क्रीडा नसून ती दिव्यांग मुलांसाठी एक उत्कृष्ट थेरपी असल्याचे मोहम्मद रोशन यांनी म्हटले. प्रोग्राम डायरेक्टर उमेश कलघटगी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या शिबिरात मुलांना मोफत वाहतूक, नाश्ता आणि किट पुरवण्यात आले होते. प्रतिभावान मुलांची पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून, ही जलतरण क्रांती गेल्या २४ वर्षांपासून सुरू असल्याचे उमेश कलघटगी यांनी सांगितले.

Tags: